एकाविरोधात गुन्हा दाखल; तिघांचा मृत्यू, तिघांची मृत्यूशी झुंज
श्रीगोंदा, ता. 16 जून २०२४
विहिरीच्या कामावर स्फोट होऊन तीन कामगारांच्या मृत्यूप्रकरणी अखेर ब्लास्टिंग ट्रॅक्टरमालक संजय शामराव इथापे (रा. टाकळीकडेवळी, ता. श्रीगोंदा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मृतांपैकी दोन कामगारांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र एका मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. आरोपीला अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे असल्याने, वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
मलंग बशीर शेख (वय 34, रा. दुरगाव, ता. कर्जत) याने याबाबत फिर्याद दिली. फिर्यादीनुसार त्याचा मेव्हूणा जब्बार सुलेमान इनामदार (वय 45, रा. टाकळीकडेवळी) नातेवाईक सुरज युसूफ इनामदार (वय 27, रा. टाकळीकडेवळी) तसेच नागनाथ भालचंद्र गावडे (वय 29, रा. बारडगाव सुद्रीक, ता. कर्जत) हे ब्लास्टींग ट्रॅक्टरमालक संजय इथापे यांच्याकडे विहिरीच्या कामासाठी मजूर म्हणून काम करत होते. शनिवारी सायंकाळी इथापे याने या तिघांना वामन गेणा रणसिंग यांच्या विहिरीच्या कामावर नेले. मजूरांना कोणतीही सुरक्षा नसताना, ब्लास्टिंगचे कोणतेही प्रशिक्षण नसताना इथापे याने मजूरांना विहीरीत जिलेटीनच्या कांड्या भरण्यासाठी स्वतःच्या पोकलेन मशिनने खाली उतरविले. त्यानंतर स्फोट होऊन तिघांचा मृत्यू झाला, तर इतर तिघे गंभीर जखमी झाले.
या घटनेत नागनाथ भालचंद्र गावडे, सूरज युसुफ इनामदार (वय २७), गणेश नामदेव वाळुंज (वय २९) यांचा मृत्यू झाला. तर जब्बार सुलेमान इनामदार (वय ४५), वामन गेनाजी रणसिंग (वय ६५), रवींद्र गणपत खामकर (वय ५५, तिघे रा. टाकळी कडेवळीत) हे गंभीर जखमी झाले. मलंग शेख याच्या फिर्यादीनुसार श्रीगोंदा पोलिसांनी संजय इथापे याच्याविरोधात भारतीय दंड विधान 304,337,338, 285,286 तसेच बारीपदार्थ अधिनियम 1908 नुसार गुन्हे दाखल केले आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे कर्जत व श्रीगोंदा तालुक्यात शोककळा पसरली असून, आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. ट्रॅक्टर मालकावर गुन्हा दाखल झाला, मात्र जिलेटीनच्या कांडा कोण पुरवतो हा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. आरोपीला अटक केल्यानंतर जिलेटीनच्या कांड्याची श्रीगोंद्यापर्यंतची साखळी उलगडण्याची शक्यता आहे. पोलिसांनी जिलेटीनच्या कांड्या नेमक्या कोण पुरवतो, कोठे तयार होतात, हे शोधणे महत्त्वाचे आहे.