कामगारच करायचा बनावट पावत्या बनवून भाविकांची फसवणूक
साईबाबा संस्थानच्या इतिहासात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, चक्क साईबाबांच्या देणगी पावत्यांची अतिशय नियोजनबद्ध रित्या अफरातफर करत थेट बाबांच्या झोळीतून चोरीचा संतापजनक प्रकार घडला आहे. हा प्रकार साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्याकडून घडल्याने, साईबाबा संस्थानचे प्रभारी लेखाधिकारी कैलास खराडे यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिस स्टेशनला या कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शिर्डीसह राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून, या संतापजनक आणि भाविकांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या या कृतघ्न कर्मचाऱ्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे.
साईबाबा संस्थानच्या लेखा शाखेतील कुशल कंत्राटी कर्मचारी दसरथ भगवंत चासकर रा. मलढोन,तालुका सिन्नर,जिल्हा नाशिक या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना संस्थान प्रशासनाला अंतर्मुख करायला लावणारी असून, घडलेली हकीकत अशी की, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष श्री सुधाकर यार्लागड्डा यांना एक निनावी पत्र प्राप्त झाले. व त्या पत्रात लिहिले होते की, साईबाबा संस्थानच्या देणगी काऊंटर येथे चोरीचा प्रकार होत आहे. या पत्राची तात्काळ दखल घेत अध्यक्ष महोदयांनी सामान्य प्रशासन साईबाबा संस्थानकडे सदर गोपनीय पत्र पाठवत चौकशीचे आदेश दिले असता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लेखाधिकारी लंके यांना सदर पत्राच्या अनुषंगाने बारकाईने चौकशी करत अहवाल सादर करण्यास सांगितले. त्या चौकशीत समोर आलेली माहिती अतिशय धक्कादायक होती व संस्थान कर्मचारी दसरथ चासकर हा चक्क सीसीटीव्ही कॅमेरे समोर असताना अतिशय सफाईदारपणे गेल्या चार ते पाच वर्षांपासून देगणी पावत्यांमध्ये अफरातफर करत होता. भाविकांच्या देणगीतून पैसे चोरत असल्याचे व बनावट पावत्या भाविकांना देत भाविकांसह,संस्थान प्रशासन आणि पर्यायाने थेट साईबाबांची फसवणूक करत असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
सदर कर्मचारी हा अतिशय नियोजनबद्ध चोरी करत होता. व त्यासाठी संस्थानच्या लेखा शाखा विभागाची प्री प्रिंटेड स्टेशनरी ही दशरथ चासकर याच्या ताब्यात होती. व त्याने भाविकांना देण्यात येणाऱ्या पावत्यांमधे विशिष्ठ फेरफार करत भाविकांना बनावट पावत्या दिल्या आहेत. तसेच एखाद्या पावतीचा क्रमांक त्याच्या मिळत्या जुळत्या पावतीशी मेळ साधत चक्क केमिकलचा वापर करत अखेरचा क्रमांक भाविकांच्या लक्षात येणार नाही, अश्या पद्धतीने खोडून हा चोरटा कर्मचारी बाबांच्या झोळीतील पैसे चोरत होता. शिर्डी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत 12 हजार 678 रुपयांची चोरी दाखविण्यात आली असून गेल्या चार ते पाच वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याने या प्रकरणी सखोल चौकशी होऊन आतापर्यंत किती रुपयांची माया बाबांच्या झोळीत हात घालून या कर्मचाऱ्याने जमविली आणि यासोबत याचे आणखी लाभार्थी कोण..? कारण एकट्या कर्मचाऱ्याचे हे काम नाही. या आणखी काही कर्मचारी आहेत का..? हे सर्व पोलिसांच्या चौकशीत समोर येईलच, मात्र या कर्मचाऱ्याच्या संपत्तीची देखील चौकशी व्हावी अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे. तसेच या प्रकरणी आणखी काहीजण असल्याची संस्थान कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. जर खरोखर आणखी कर्मचारी यात सामील असतील तर साईबाबा संस्थानचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष या प्रकरणी लक्ष घालून थेट बाबांच्या झोळीत हात घालण्याची हिम्मत करणाऱ्यांवर कारवाई करतील का ? असा प्रश्न आता नागरिकांमधून आणि भाविकांमधून विचारला जात आहे.