“त्यांच्या” नादाला कशाला लागता ते कोण आहेत माहित नाही का..? असे म्हणत पोलिस अधिकारीच आरोपींचा बचाव करत असल्याचा नातेवाईकांचा खळबळजनक आरोप..!
श्रीगोंदा दि.7 नोव्हेंबर 2023 2023
श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील वैशाली राहुल दरेकर या 26 वर्षीय विवाहितेने 19 ऑक्टोबर रोजी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. सासरी होणाऱ्या छळाला व वारंवार पैशाच्या मागणीला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची फिर्याद मृताचा भाऊ दीपक काकडे (रा. कोंभळी, ता. कर्जत) यांनी दिली होती. श्रीगोंदा पोलिसांनी पती राहुल आश्रु दरेकर, सासरा आश्रु चंद्रकांत दरेकर, सासू मथूरा दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र घटनेला 15 दिवस उलटूनही आरोपींना अटक झालेली नाही. पोलिस या गुन्ह्याचा तपास करताना टाळाटाळ करत असल्याचा आरोप मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी केला आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षकांसह गृह मंत्रालय तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.
हुंड्यासाठी आमच्या मुलीचा छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सासरच्या आरोपींना पोलिस पाठीशी घालत असल्याचा आरोप मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. त्याच बरोबर मयताच्या घरातील नातेवाईक वेळोवेळी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे तपासी अधिकारी यांना गुन्ह्याबाबत भेटले असता तपाशी अधिकाऱ्यांनी कुठलीही माहिती दिली नाही. घटनेला पंधरा दिवस उलटूनही नातेवाईकांचा जबाब देखील नोंदवला नाही. आरोपींना अटकेची मागणी केली असता आम्हाला आरोपींचे लोकेशन द्या,आरोपींना शोधण्यासाठी गाडी उपलब्ध करून द्या, व आरोपींच्या नातेवाईकांचे मोबाईल नंबर नाव पत्ते उपलब्ध करून द्या, अशा प्रकारची मागणी तपाशी अधिकारी करत आहेत. असेही निवेदनात म्हटले आहे.
सदरचा गुन्हा गंभीर असून आरोपी हे राजकीय दृष्ट्या मोठे असून राजकीय दबावातून आरोपींना अटक करण्याची टाळाटाळ पोलीस करत आहेत. कृष्णा काकडे यांनी फोन द्वारे आरोपींच्या अटकेची चौकशी केली असता तपाशीअधिकारी त्यांना म्हणाले की तुम्हाला आरोपी कोण आहेत हे माहीत नाही का?ते हिरडगावचे दरेकर आहेत. त्यांच्या नादाला कशाला लागतात.अशा प्रकारे तपाशी अधिकारी फिर्यादींच्या घरच्यांना बोलत आहेत हा प्रकार गंभीर असून आरोपींविरोधात ठोस पुरावे उपलब्ध असून सुद्धा आरोपींना अटक होत नाही.असे निवेदनात म्हटले आहे.त्याचबरोबर तपासी अधिकाऱ्यांकडून हा तपास योग्य होणार नाही,त्यामुळे या घटनेचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्याची मागणी फिर्यादींच्या कुटुंबियांनी केली आहे.
बहिणीच्या सासरच्यांनी वेळोवेळी पैशाची मागणी केली. यापूर्वी घरासाठी दोन लाख दिले असताना आता गाडी घेण्यासाठी तिच्या सासरच्यांना पुन्हा पैसे हवे होते. यापूर्वी दिलेल्या पैशाचे पुरावे पोलिसांना देऊनही पोलिस आरोपींना अटक करण्याची टाळाटाळ करत असल्याचे मृत विवाहितेच्या भावाने निवेदनात म्हटले आहे. शिवाय आरोपींची पोहोच वरपर्यंत असल्याचेही मध्यस्थी सांगत असून,प्रकरण मिटविण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
सामान्यांना न्याय मिळत नसेल तर तालुक्यात कायद्याचे राज्य आहे का ?असा सवाल करत मृताच्या नातेवाईकांनी 10/11/2023 या दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. आरोपी अद्याप मोकाट असून त्यांचा जबाबही न नोंदविणाऱ्या दोषी पोलिसावर कारवाई करण्याची मागणी काकडे कुटुंबियांनी गृह मंत्रालयाकडे केली आहे.
यासंदर्भात तपाशी अधिकारी यांच्याशी नगरीपंचनी संवाद साधला असता तपाशीअधिकारी म्हणाले की,तांत्रिक दृष्ट्या तपासाला अडचण येत असून तपास योग्य पद्धतीने सुरू आहे आम्ही लवकरात लवकर आरोपींना अटक करू.