ताज्या बातम्याकाय..! सेतू चालकांबरोबर 'त्या'अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणार का?

काय..! सेतू चालकांबरोबर ‘त्या’अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणार का?

spot_img
spot_img

श्रीगोंद्यात सेतू चालकांची तपासणी : अनेकांनी केली दुकाने बंद..

श्रीगोंदा – दि.27 ऑगस्ट 2024

राज्य सरकारने सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी विविध सरकारी दाखले सेतू कार्यालयांमार्फत देण्याचा निर्णय घेतला. त्या प्रक्रियेत हाेणारा भ्रष्टाचार थांबवणे, हा त्या मागील हेतू हाेता. मात्र प्रत्येक दाखल्यासाठी निर्धारित शुल्कापेक्षा १० ते २० पट फी आकारणी केली जात असल्यामुळे हे भ्रष्टाचाराचे ‘सेतू’ असल्याचे स्पष्ट हाेत आहे. एका दाखल्यासाठी ३३ रुपये ६० पैसे इतके शुल्क आकारण्याची मुभा असताना प्रत्यक्षात मात्र १०० ते २०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम घेतली जात असून, त्यातून लाखोंचा भ्रष्टाचार केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

ही सर्वसामान्य नागरिकांची लूट असून वारंवार तक्रारी करूनही त्याबाबत महसूल विभाग कारवाई का करत नाही, असा प्रश्न नगरीपंचने उपस्थित केला होता. त्यानंतर प्रशासनाने खडबडून जागे होत सेतू चालकांना नोटीस काढत, बैठक बोलावत तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी कडक सूचना दिल्या.

गावोगाव सेतू कार्यालयांतून उत्पन्नाचा दाखला, रहिवास प्रमाणपत्र, अल्पभूधारक दाखला, नॉन क्रीमिलेअर, जात प्रमाणपत्र, जात प्रतिज्ञापत्र, संजय गांधी निराधार योजना दाखला, शेतकरी प्रमाणपत्र, अर्थ कुटुंब प्रमाणपत्र, ३३ टक्के महिला आरक्षण, एसईबीसी दाखले इत्यादी देण्याचे कार्य होते. त्यासाठी सरकारने प्रत्येक तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये सेतू सुविधा केंद्रांना परवानग्या दिल्या. परंतु श्रीगोंदा तालुक्यात गावोगावी दिलेल्या सेतू कार्यालयाच्या परवानग्या गावात सुविधा व्हावी म्हणून दिल्या. पण मागील अनेक वर्षांपासून प्रत्यक्षात ते सेतू गावात नसून तहसील कार्यालयाच्या अगदी समोरच मोठ्या दिमाखात थाटले आहेत. विशेष म्हणजे या श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर अनेक नेते पुढारी कार्यकर्ते आंदोलनाच्या निमित्ताने एकत्र येतात. पण येथील बेकायदेशीर बाबी लक्षात येऊनही स्वयंघोषित पुढाऱ्यांनी का डोळे झाक केली असेल ही एक खंतच आहे. हेच राजकारणी सामान्य नागरिकांना झालेला त्रास, हेलपाटे उघड्या डोळ्यांनी पाहत असतात. पण निवडणुका आल्या की याच सामान्यांच्या जीवावर हे चमकोगिरी करतात. म्हणजे मतांचा जोगवा मागायला मोकळे. इथून मागे सुद्धा कित्येक तहसीलदार, प्रांताधिकारी येऊन गेले परंतु सेतुंबाबत एवढ्या मोठया बेकायदेशीर गोष्टी व सामान्यांची पिळवणूक त्यांच्या निदर्शनात कशी आली नाही, असा प्रश्न नगरीपंचने उपस्थित केला होता .

नगरी पंचने याबाबत माहिती घेतली असता श्रीगोंदा शहरात अधिकृत फक्त चारच सेतू कार्यालय आहेत. आणि शहरातील सेतूंची संख्या जवळपास 30 च्या आसपास आहे, इतर सेतू हे बाहेर गावचे आहेत. यामध्ये अजून एक बाब उघडकीस आली आहे. ती म्हणजे सेतू कार्यालय सुरू करण्यापूर्वी शासकीय नियमानुसार ज्या कार्यक्षेत्रात सेतू केंद्र सुरू करायचे असतील त्या कार्यक्षेत्रातील कागदपत्राची पूर्तता करावी लागते. त्याच अनुषंगाने सेतू चालकांना रहिवासी दाखला इतर कागद पत्रासोबत आवश्यक असतो. आणि तो व्यक्ती ज्या गावात राहत असेल तर त्याची चौकशी करून ग्रामपंचायत स्तरावर रहिवासी दाखला दिला जातो, किंवा एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या व्यवसायाची शहानिशा करूनच प्रशासकीय अधिकारी त्या संदर्भातील लागणारे कागदपत्रे देत असतात,परंतु शासनाच्या एवढ्या मोठ्या योजनेत या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी फक्त लक्ष्मी दर्शनासाठी गावोगावी दिलेल्या सेतूंचे आयडी चालवण्यासाठी लागणारा रहिवासी दाखला गावचाच दिला . परंतु प्रत्यक्षात पाहिले असता. रहिवासी गाव पातळीवरचा व सेतू केंद्र तालुका पातळीवर अशी परिस्थिती आहे. इतर वेळी हजार चौकशा करणाऱ्या या अधिकाऱ्यांना रहिवाशी दाखला दिल्यानंतर हे सेतू कार्यालय आपण दिलेल्या रहिवाशी दाखल्याच्या ठिकाणी आहे का नाही हे सुद्धा पहावेसे वाटले नाही का ? कार्य क्षेत्राच्या बाहेर जाऊन कामं करणं नियमबाह्य ठरत नाही का ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो. त्यामुळे मा. तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकरणाचा जाब विचारावा व जेवढे सेतू चालक जबाबदार तेवढेच हे प्रशासकीय अधिकारी सुद्धा जबाबदार. त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करावी अशी मागणी सध्या नागरिकांमधून होत आहे.

हा सर्व प्रकार पाहून, यापूर्वीच नगरी पंचने सेतू चालक व अधिकारी यांचेच काही लागेबांधे आहेत का अशा चर्चा तालुक्यात चर्चिल्या जात आहेत, असे आपल्या वृत्तांमधून प्रकाशित केले होते आणि आता ते तंतोतंत खरे ठरत असल्याचा अनुभव आला आहे.

नियमांची पायमल्ली झाल्यास मान्यता रद्द 

सेतू कार्यालयातील दप्तराची तपासणीची तरतूद कायद्यात आहे. मात्र, सेतू चालक महसूल कार्यालयात जाऊन दप्तरावर सह्या आणतात. असाही आरोप श्रीगोंद्यातील नागरिकांनी केला होता. त्याच अनुषंगाने तहसीलदार वाघमारे यांनी तातडीने कारवाई करत या सगळ्या गोष्टी यापुढे चालणार नाहीत अशा सूचना करत बैठकीत सेतू चालकांना खडसावले होते त्याच अनुषंगाने नगरी पंच मध्ये प्रकाशित होत असणाऱ्या वृत्ताची दखल घेत काल सोमवार दि. 26/8/2024 रोजी नायब तहसीलदार अमोल बन यांनी सेतू कार्यालयांची तपासणी केली. त्याच दरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. या तपासणी दरम्यान अनेक सेतू चालकांची धावपळ होऊन अनेकांनी दुकानं बंद करून पळ काढण्याचा मार्ग स्वीकारला. त्याचे कारण असे की, दुकानाचा परवाना एकाच्या नावावर आणि चालवणारा दुसराच, सेतू एका ठिकाणचा व चालवला जातो तहसील कार्यालयाच्या अगदी समोर अशा अनेक बाबी उघड झाल्याच्या समजते.

चौकट १

मा .तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी सेतू चालकांना आपल्या असलेल्या आयडीवर आपले सेतू केंद्र सात दिवसात स्थलांतरित करावेत अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अनेक सेतू चालकांचे धाबे दणाणले असून या सेतू चालकांबरोबरच कागदपत्राची पूर्तता करणारे ते प्रशासकीय अधिकारी तितकेच दोषी आहेत त्यांच्यावरही मा. तहसीलदार यांनी कडक कारवाई करावी अशी मागणी आता श्रीगोंदेकर करत आहेत.

चौकट 2

मा. तहसीलदार वाघमारे मॅडम यांच्या सूचनेनुसार ई- रेशन कार्डचे जे कामकाज सुरू आहे ते व्यवस्थित सुरू आहे का नाही ते तपासण्यासाठी सेतू कार्यालयामध्ये भेट दिली. सीएससी केंद्र सेतू चालक यांच्याकडून रेशन कार्ड काढण्यासाठी जी काही टाळाटाळ होत आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती, ते टाळण्याच्या दृष्टिकोनातून सेतू चालकांस सक्त ताकीत देत ई- रेशन कार्ड तुम्हाला ऑनलाईन करणे आहे, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या असे सांगितले. अधिकृत सेतू बाबत तपासणी केली असून जे अनाधिकृत आहेत त्यांच्यावर मा. तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच कारवाई करण्यात येईल.

नायब तहसीलदार :अमोल बन

लेटेस्ट न्यूज़