अहमदनगर दि.7 ऑक्टोबर 2023
खेड्यातील विद्यार्थ्यांना मिळत आहे ‘हायटेक शिक्षण’
जगभरामध्ये शिक्षणाची परंपरा हजारो वर्षांपासून चालत आली आहे. बदलत्या काळानुसार शिक्षण शास्त्र विकसित होत गेले. अभ्यासक्रम पाठ्यपुस्तके, अध्यापन पद्धती, यामध्ये स्थित्यंतरे होत गेली. मुलांच्या भावनिक मानसिक बौद्धिक विकासाच्या अनुषंगाने तसेच त्यासाठी पोषक बाबींचा तंत्रांचा विचार आणि विस्तार होत गेला. हळूहळू शाळा ही संकल्पना अधिक दृढ होत गेली. शिक्षण हे प्रवाही आणि परिवर्तनशील आहे. काळानुसार बदलणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक गरजांच्या अनुषंगाने शिक्षणात अखंडपणे बदल होत आहेत. शिक्षणात चालणारे प्रयोग संशोधन आणि बदलत्या काळाचे भान ठेवून नवीन कल्पना प्रत्यक्षात येत आहेत.
आता शाळेतील विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याचे शिक्षण आनंददायी व्हावं व सामाजिक बांधिलकी जपावी यासाठी आटापिटा करणारी माणसं थोडीच असतात. त्यापैकी एक म्हणजे मा. सचिन अरुणकाका जगताप,
मा.सचिनभाऊ जगताप यांच्या प्रेरणेतून जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी गिरवताहेत अब्याकसचे धडे.
बनपिंपरी तालुका श्रीगोंदा या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील गणित हा सर्वात अवघड विषय अतिशय सोप्या पद्धतीने हसत खेळत शिकता यावा म्हणून, मा.सचिन अरुणकाका जगताप यांच्या प्रेरणेतून बनपिंपरी गावच्या जिल्हा परिषद शाळेत अबॅकस चे क्लास सुरू करण्यात आले आहेत.
अनेक विद्यार्थ्यांना हे क्लास लावणे व इतर शिक्षण घेणे शक्य नसल्याने या विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे असे, सचिन जगताप यांनी सांगितले.
या क्लासच्या उद्घाटनासह, आपल्या शाळेतील विद्यार्थी सुद्धा इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसारखे दिसले पाहिजेत, म्हणून विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचा गणवेश, शूज आणि सॉक्स यांचे सुद्धा वाटप करण्यात आले.
बनपिंप्री येथील जिल्हा परिषद शाळा ही जिल्ह्यात पहिली ‘जिल्हा परिषद’ शाळा ठरली आहे. इथे अबॅकस सारखे क्लासेस सुरू आहेत. इथे खेड्यातील मुलांना हायटेक शिक्षण देण्याचा मानस येथील भूमिपुत्रांचा आहे. याशिवाय ग्राम स्वच्छता अभियान, जनजागृती, आठवडे बाजार, शैक्षणिक साहित्याची मदत, शिक्षण प्रबोधन, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, असे अनेक उपक्रम या गावात शाळेत व परिसरात मा.सचिन जगताप यांच्या माध्यमातून राबविले जातात.